जळगाव स्टेशनवर घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) : काशी एक्स्प्रेसमधून पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना जळगावच्या फलाट क्रमांक २ वर मंगळवारी दुपारी १२ वाजता घडली. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रवींद्र साहेबराव पाटील (५८, रा. शिवाजीनगर, जळगाव) असे मृताचे नाव आहे. जळगाव रेल्वेस्थानकावर फलाट क्र. २ वर नेहमीप्रमाणे मंगळवारी दुपारी बारा वाजता काशी एक्स्प्रेस आली. गाडी थांबण्यापूर्वीच बोगीच्या दारात उभे असलेले रवींद्र यांचा अचानक तोल जाऊन ते खाली फेकले गेले. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिस उपनिरीक्षक अनिंद्र नगराळे व सहकाऱ्यांनी तत्काळ धाव घेत त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रवींद्र यांच्या खिश्यात आढळून आलेल्या कागदपत्रावरून ओळख पटविण्यात आली. रेल्वे पोलिसांनी शिवाजीनगरातील त्यांच्या कुटुंबीयांना संपर्क करून माहिती दिली. कुटुंबीयांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली. तेथे रवींद्र यांचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी रेल्वे पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अनिंद्र नगराळे करत आहेत.