बाथरूमला जाताना अचानक तोल गेल्याने घटना
रावेर (प्रतिनिधी) :- येथील रेल्वे स्थानकाजवळ आज सोमवारी दि. २० रोजी दुपारी उत्तर प्रदेशातील कानपूर येथून प्रवास करणाऱ्या ५० वर्षीय प्रवाशाचा रेल्वेतून पडून जागीच मृत्यू झाला. रावेर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.
मृत प्रवाशाचे नाव राजेंद्र कुमार निकम असे असून, त्यांच्यासोबत त्यांचे काही नातेवाईकही प्रवास करत होते.दुपारी सुमारे ३ वाजता मुंबई–कानपूर एक्सप्रेस रावेर रेल्वे स्थानकाजवळून सुटत असताना ही दुर्घटना घडली. प्रवासादरम्यान झोपेतून उठून बाथरूमकडे जाण्यासाठी निघालेले राजेंद्र कुमार यांचा अचानक तोल गेला आणि ते थेट खाली रेल्वे रुळांवर पडले. हा अपघात इतका भीषण होता की ते जागीच मरण पावले. ट्रेनने वेग घेतलेला असताना झालेल्या या घटनेमुळे उपस्थित प्रवाशांमध्ये आणि स्थानकावरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
अपघाताची माहिती मिळताच रावेर येथील समाजसेवक रवी भाऊ पाटील व त्यांच्या मित्रपरिवाराने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ संबंधित यंत्रणेला कळवले आणि नंतर मृतदेह उचलून रावेरच्या स्मशानभूमीकडे नेण्यात आला. सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत रवी पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत राजेंद्र कुमार निकम यांच्यासोबत नितीन कुमार निकम, मंटु निकम, अनिकेत निकम, अनुज निकम हे नातेवाईकही प्रवास करत होते. त्यांच्या समोरच ही दुर्दैवी घटना घडल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.