जळगावातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील ४५ वर्षीय इसमाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार, ३० डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास प्रजापतनगरनजीक असलेल्या रेल्वे रुळाजवळ घडली. ते पत्नीला घेण्यासाठी त्यांच्या सासरी जात होते. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
धर्मा किसन गवळी (४५, रा. पवननगर, प्रजापत नगर परिसर, जळगाव) असे मयत इसमाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. ते
बांधकामाच्या ठिकाणी सेंटरिंगचे काम करून उदरनिर्वाह करीत होते. धर्मा गवळी यांच्या पत्नी खंडवा येथे माहेरी गेल्या होत्या. त्यांना घेण्यासाठी गवळी हे सकाळी रेल्वेने जायला निघाले. त्या वेळी प्रजापतनगरनजीक रेल्वे रुळावर खांबा क्रमांक ४२१/२बी ते ४२१/४बी दरम्यान ते रेल्वेतून खाली पडले.
नागरिकांनी धाव घेऊन तालुका पोलिसांना माहिती दिली. त्या वेळी गवळी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. मयताच्या खिशात रेल्वेचे तिकीटही आढळून आले आहे. जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोहेकॉ सुधाकर शिंदे, पोना ज्ञानेश्वर कोळी यांनी घटनेची नोंद केली. पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.