रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाची कारवाई
भुसावळ (प्रतिनिधी) : गांधीधाम एक्सप्रेसमधून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या सीआयबी पथकाला मिळाली होती. त्यानुसार, पथकाने मंगळवारी (२ सप्टेंबर) जळगाव-भुसावळ दरम्यान गाडीची तपासणी करून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींच्या बॅगेतून तब्बल ९ लाख रुपये किमतीचा ४२.२८० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
रेल्वे सुरक्षा बलाच्या सीआयबीला गाडी क्रमांक १२९९४ अप गांधीधाम एक्सप्रेसमध्ये गांजा तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे आरपीएफ आणि जीआरपीच्या पथकाने वीरू नावाच्या श्वान पथकासह भुसावळ-जळगाव दरम्यान गाडीची तपासणी केली. तपासणीदरम्यान, एस-५ या स्लीपर कोचमधील तीन प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी त्यांना बॅगांसह ताब्यात घेतले आणि पंचांसमक्ष बॅगांची झडती घेतली. यात २१ पाकिटांमध्ये ८ लाख ४५ हजार ६०० रुपये किमतीचा गांजा आणि ३५ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन आढळले.
या प्रकरणी नलूमालु जसवंत डोरा (वय २५), विप्र प्रकाश विद्याधर सेठी (वय १९) आणि अलक सुभाषचंद्र बारीक (वय २५) या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे सर्व ओडिसा येथील रहिवासी आहेत. त्यांच्याविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास लोहमार्ग पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर करत आहेत. अटकेनंतर तिन्ही आरोपींना भुसावळ रेल्वे न्यायालयात हजर केले असता, त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत आरोपींनी हा गांजा ओडिशातून अहमदाबादला नेत असल्याचे सांगितले आहे.