नाशिक जिल्ह्यातील कसारा स्टेशनवरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : कसारा स्थानकावर थांबलेल्या लोकल ट्रेनच्या मोटरमनच्या केबिनमध्ये घुसखोरी करणाऱ्या दोन व्यक्तींना मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) यशस्वीरित्या पकडले आहे. ते केबिनमध्ये जाऊन व्हिडिओ रिल्स बनवत होते असे निदर्शनास आले आहे.
राजा हिम्मत येरवाल (वय २०) आणि रितेश हिरालाल जाधव (वय १८, दोघे रा. नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. (केसीएन) दि. २५ जुलै रोजी कसारा स्थानकात प्लॅटफॉर्म ४ वर उभ्या असलेल्या उपनगरीय ट्रेन क्रमांक ९५४१० च्या मोटरमनच्या केबिनमध्ये एका तरुणाने प्रवेश केला आणि दुसऱ्या तरुणाने व्हिडिओ शूट केला. जो सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला होता.
मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने सायबर सेलच्या सहकार्याने या दोघांना नाशिक येथून दि. ८ ऑगस्ट रोजी पकडले. चौकशीदरम्यान, तरुणांनी सोशल मीडियासाठी व्हिडिओ तयार करण्यासाठी ट्रेनच्या मोटरमनच्या केबिनमध्ये प्रवेश केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना आरोप ठेवण्यात येऊन अटक करण्यात आली.
मध्य रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करते आणि प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आणणारी, रेल्वेच्या कामकाजात अडथळा आणणारी आणि रेल्वे कायदे आणि नियमांचे उल्लंघन करणारी अशी कृत्ये करू नयेत असे आवाहन सर्व लोकांना करते. दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
यापुढे सर्व नागरिक आणि प्रवाशांना रेल्वे विनंती करीत आहे की, रेल्वेच्या आवारात कोणीही असे कृत्य करत असल्यास ९००४४१०७३५ किंवा १३९ या मोबाईल क्रमांकावर त्वरित संपर्क साधून तक्रार करावी. प्रवाशांच्या सुरक्षिततेला भारतीय रेल्वेचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि प्रवासी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यासाठी अधिकारी सर्व आवश्यक उपाययोजना करत आहेत.