भुसावळ न्यायालयाचा निर्णय
भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ रेल्वे स्टेशनवर तिकिटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी आरोपी सुजीतकुमार ईश्वरसिंग पाटील (वय ३७, जळगाव) याला न्यायालयाने दोषी ठरवले असून ७ हजार रुपयांचा दंड आणि न्यायालय उठेपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली. भुसावळ येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (रेल्वे मार्ग) व्ही. बी. साळुंके यांनी २८ फेब्रुवारी रोजी हा निर्णय दिला. दंड न भरल्यास आरोपीला ७ दिवसांचा साधा कारावास भोगावा लागेल.
रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) भुसावळ यार्डच्या तक्रारीनुसार, आरोपी सुजीतकुमार पाटील हा धार्मिक यात्रेसाठी प्रवाशांना अनधिकृतरित्या तिकिटे पुरवायचा. दिनांक २० जुलै २०२३ रोजी भुसावळ रेल्वे स्टेशनच्या फलाट क्र. ५ वर त्याला अटक करण्यात आली. तपासणीदरम्यान त्याच्याकडून २२ ई-तिकिटे आणि एक मोबाइल जप्त करण्यात आला. चौकशीत त्याने तिकिटे खरेदीसाठी २ हजार ५०० ते ११ हजार रुपये कमिशन घेत असल्याची कबुली दिली. ३० जानेवारी २०२५ पासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.
सरकारी वकील आर. के. ताम्रकार आणि ए.के. सिंग यांनी आरोपीविरुद्ध पुरावे सादर केले. यात साक्षीदारांचे जबाब, आरोपीचा कबुलीजबाब आणि जप्ती पंचनाम्याचा समावेश होता. आरोपीच्या बाजूने वकील योगराज रसे यांनी बचाव केला.