जळगाव तालुक्यातील डोमगाव फाट्यावर घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील डोमगाव फाट्याजवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने म्हसावद येथील प्रौढाचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना गुरूवारी १६ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लक्ष्मण काळू धोत्रे (वय ४९ रा. म्हसावद ता. जळगाव) असे मयत प्रौढाचे नाव आहे.म्हसावद गावात लक्ष्मण धोत्रे हे पत्नी व तीन मुलांसह वास्तव्याला होते. दगडातून पाटा व वरवंटा बनविण्याचे काम करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. गुरूवारी १६ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता घरात काहीही न सांगता घरातून निघुन गेला. दरम्यान गावाजवळील डोमगाव फाट्याजवळील रेल्वे रूळावरून जात असतांना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्यांचा रात्री ९ वाजेच्या सुमारास जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळाल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्याचे आणि रेल्वेचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून मयताची ओळख पटविली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे रवाना करण्यात आला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.