भुसावळ लोहमार्ग पोलिसांची कामगिरी
भुसावळ (प्रतिनिधी) : रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवाशांची पर्स चोरणाऱ्या तीन परराज्यातील संशयित आरोपींना भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी मोठी कारवाई करत अटक केली आहे. त्यांच्याकडून १८ लाख ६ हजार १८९ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
फिर्यादी दिलीपकुमार प्रथाचंद जैन (वय-५७, रा. नेल्लोर सिटी, आंध्रप्रदेश) हे दि. ३० डिसेंबर २०२४ रोजी पत्नीसह ट्रेन नंबर १२६५५ (नवजीवन एक्सप्रेस) मधून अहमदाबाद ते नेल्लोर प्रवास करत होते. भुसावळ रेल्वे स्टेशनजवळ त्यांच्या पत्नीची पर्स चोरीला गेली. पर्समध्ये ५ लाख ५० हजार रुपये किमतीचे २७५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ८० हजार रुपये रोख आणि २ हजार रुपये किमतीचा मोटोरोला कंपनीचा मोबाईल फोन होता. जैन यांनी नेल्लोर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, त्यानंतर गुन्हा भुसावळ लोहमार्ग पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला.
भुसावळ लोहमार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर, सपोनि किसन राख, रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी आणि गुन्हे प्रगटीकरण पथकाने संयुक्तपणे या गुन्ह्याचा तपास सुरू केला. गुप्त बातमी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी भुसावळ रेल्वे स्टेशनवर गुन्हा घडल्यानंतर दीड महिन्याने संशयितांना पकडले. अटक केलेल्या संशयित आरोपींकडून चोरीला गेलेले २३४ ग्रॅम ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले, ज्याची आजच्या बाजारभावानुसार किंमत १८ लाख ६ हजार १८९ रुपये आहे. संशयित आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का, याचा तपास पोलीस करत आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार जयकुमार रमेश कोळी आणि गुन्हे प्रगटीकरण शाखेचे पथक करत आहे.