पुणे ( प्रतिनिधी ) – महिला रेल्वे टीसी अधिकाऱ्याने दुसऱ्या महिलेला रेल्वेत टीसी म्हणून नोकरी लावते असं सांगून आठ लाख ५० हजारांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. निगडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला .
संजीवनी पाटणे असं २५ वर्षीय आरोपी महिला टीसी अधिकाऱ्याचे नाव आहे. सुमित्रा हुले यांनी निगडी पोलिसाकडे केलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आलीय.
तक्रारदार महिलेचे ब्युटी पार्लर असून याच ठिकाणी आरोपी महिला आणि तक्रारदार महिलेची ओळख झाली. संजीवनी यांनी रेल्वेत टीसी असल्याचं सुमित्रा यांना सांगितलं होतं. हळूहळू या दोघींची मैत्री झाली. जेव्हा जेव्हा भेट व्हायची तेव्हा नोकरीसंदर्भात त्यांच्यात चर्चा होत असे. मी रेल्वेत टीसी या पदावर असून तुला आणि तुझ्या भावाला नोकरी लावते असे संजीवनीने ३२ वर्षीय सुमित्रा यांना सांगितलं.
नोकरीचं आश्वासन देऊन संजीवनीने सुमित्रा यांचा विश्वास संपादन केला. तक्रारदार सुमित्रा यांनी भावाचे आणि त्यांचे मिळवून एकूण ८ लाख ५० हजार रुपये संजीवनीला दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. मात्र पैसे दिल्यानंतरही दोघांपैकी एकालाही नोकरी लागली नाही. फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर सुमित्रा यांनी निगडी पोलिसात तक्रार दिली. संजीवनीला निगडी पोलिसांनी अटक केली आहे.