५ लाख ६३ हजारांचे दागिने चोरणारा अपंग आरोपी !
भुसावळ ( प्रतिनिधी ) – रेल्वेत झोपलेल्या महिलेची दागिन्यांची पर्स चोरणारा आरोपी भुसावळ रेल्वे पोलिसांनी सुरतमध्ये जाऊन २४ तासांत पकडून आणला . ५ लाख ६३ हजारांचे दागिने चोरणारा हा आरोपी अपंग आहे .
फिर्यादी महिला गीताबेन पटेल ( वय ३८ , रा – सुरत ) ह्या २१ नोव्हेम्बररोजी अहमदाबाद – पुरी एक्सप्रेसमधून प्रवास करीत होत्या . सुरतेहून निघाल्यानंतर त्या रायपूरला जात होत्या . त्या झोपेत असताना जळगाव ते भुसावळ दरम्यान अज्ञात चोराने त्यांनी डोक्याखाली ठेवलेली पर्स चोरून नेली . या पर्समध्ये सोन्याचे मंगळसूत्र , हार , २ चैन , एक रिंग , अंगठी , मोबाईल आणि रोख १ हजार रुपये होते . जाग आल्यावर त्यांनी वडनेरा रेल्वे पोलीस ठाण्यात नोंदवलेला गुन्हा शून्य क्रमांकाने भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला होता . या पोलिसांनी तपासात भुसावळ स्थानकावर या गाडीतून उतरलेल्या प्रवाशांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले . तो ज्या रिक्षेतून गेलेला दिसला त्या रिक्षाचालकांचा शोध घेऊन पोलीसांनी माहिती मिळवल्यावर तो भुसावळात कन्हैया कुंज हॉटेलमध्ये थांबला असल्याचे समजले . तेथे त्याचे नाव साबीर लंगडा असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे व सुरतचा रहिवाशी असल्याचे स्पष्ट झाले .
त्यांनतर भुसावळ रेल्वे पोलिसांचे पथक सुरतला गेले . त्याचा शोध घेतल्यावर त्याला सापळा रचून अटक करण्यात आली . त्याचे मूळ नाव अब्दुल साबीर रहेमान शेख असून हा ३० वर्षांचा आरोपी विंग न ९ , बी ब्लॉक , वेस्टन आवास , सचिन रोड , सुरत येथील रहिवाशी आहे त्याला भुसावळला आणून त्याच्याकडून हे सगळे ५ लाख ६३ हजार रुपये किमतीचे दागिने मोबाइलसह जप्त करण्यात आले आहेत .
भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्याचे पो नि विजय येरडे , राधाकृष्ण मीना , गुप्त वार्ता विभागाचे पो नि सुरेश थोरात , पो उ नि संजय साळुंखे , हवालदार ठाकूर , घुले , खंदारे , भूषण पाटील , कैलास बोडके यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास तडीस नेऊन २४ तासांत आरोपीला पकडले . औरंगाबादच्या लोहमार्ग पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी या पथकाला या कामगिरीबद्दल ५ हजार रुपयांचे बक्षीद दिले आहे .