जळगाव (प्रतिनिधी) – येथील सराफी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाचा रेल्वेखाली आल्याने दुःखद मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. घटनेमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून त्यांनी रुग्णालयात आक्रोश केला होता.
दिनेश अशोक सोनार (वय ४०, रा. ज्ञानदेव नगर, जळगाव) असे या तरुणाचे नाव आहे. त्याचे शहरातील गोलाणी मार्केट येथे सराफी दुकान आहे. त्याद्वारे तो आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतो. गुरुवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जळगाव ते म्हसावद रेल्वे लाईन दरम्यान त्याचा मृतदेह आढळून आला.
माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी धाव घेऊन त्याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. डी. महाजन यांनी त्यास मयत घोषित केले.
दरम्यान दिनेश सोनार यांचा मृतदेह पाहतच त्यांच्या कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. दिनेश सोनार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.