ओळख पटवण्याचे तालुका पोलिसांचे आव्हान
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील निमखेडी शिवारामध्ये असणाऱ्या रेल्वे रुळाजवळ अज्ञात महिलेचा रेल्वेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना रविवारी २५ जून रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. मयत महिलेची ओळख पटवण्याचे आवाहन तालुका पोलिसांनी केले आहे.
पाळधी दूरक्षेत्राच्या भागामध्ये गाडी क्रमांक २०९०६ च्या लोको पायलटने सूचना दिली की, खांबा क्रमांक ३०१/७ जवळ एक महिला मृतावस्थेत रेल्वे ट्रॅकच्या बाजूला पडली आहे. त्यानुसार तालुका पोलीस स्टेशनला कळविण्यात आले. तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला.
तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिलेस मयत घोषित केले. महिलेच्या डोक्याला, कपाळावर जबर मार लागल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. तिच्या दोन्ही हातामध्ये पिवळ्या धातूच्या प्रत्येकी दोन बांगड्या आहेत. तिचे वय सुमारे ३५ ते ४० या घरात असावे असे पोलिसांनी सांगितले.
मयत महिलेची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. प्राथमिक तपास पीएसआय गणेश सायकर यांच्यासह अनिल फेगडे, अनिल मोरे, नरेंद्र पाटील करीत आहेत.