मुंबई-चेन्नई मार्गावरील गाडीच्या शौचालयात ‘ISI’ आणि ‘पाकिस्तान झिंदाबाद’चा उल्लेख;
भुसावळ स्थानकावर श्वानपथक, बॉम्बशोधक पथकासह कसून तपासणी
जळगाव / भुसावळ प्रतिनिधी
मुंबई–चेन्नई (कोल्हापूर) दरम्यान धावणाऱ्या महानगरी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा संशय निर्माण करणारा धमकीवजा संदेश सापडल्याने बुधवारी सकाळी मध्य रेल्वेच्या मार्गावर मोठी खळबळ उडाली. या संदेशात ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि ‘आयएसआय’ (ISI) असा देशविरोधी उल्लेख असल्याचे दिसून आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तातडीने हाय अलर्ट घोषित करत तपासणी मोहीम राबवली.

मिळालेल्या माहितीनुसार, महानगरी एक्स्प्रेसच्या एका डब्यातील स्वच्छतागृहात अज्ञात व्यक्तीने ‘आयएसआय’ आणि ‘पाकिस्तान झिंदाबाद’ असे शब्द लिहून ठेवले होते. या मजकुरात ‘गाडीत बॉम्ब आहे’ असा इशाराही दिला गेला होता. हा प्रकार सर्वप्रथम दादर स्थानकावर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला आणि तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आला. त्यानंतर संपूर्ण मार्गावरील रेल्वे स्थानकांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले.
भुसावळ स्थानकावर कसून तपासणी ; श्वानपथक, बॉम्बशोधक पथक तैनात
सकाळी सुमारे ८.३० वाजता गाडी भुसावळ स्थानकावर दाखल होताच रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि लोहमार्ग पोलीस (GRP) यांनी संयुक्त तपास मोहीम सुरू केली. श्वानपथक तसेच बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्कॉड (BDS) पाचारण करून प्रत्येक डब्याची काटेकोर तपासणी करण्यात आली. प्रवाशांच्या सामानाचीही कसून झडती घेण्यात आली.
सुरक्षा यंत्रणांनी गाडीतील प्रत्येक कोपरा, आसन, लगेज रॅक आणि शौचालय तपासून पाहिले. जवळपास तासाभर चाललेल्या या तपासणीनंतर कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा स्फोटक साहित्य आढळले नाही. त्यानंतर सकाळी ९ वाजता महानगरी एक्स्प्रेसला पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आले.
रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक पी.आर. मीना यांनी सांगितले, “संपूर्ण गाडीची तपासणी बॉम्बशोधक पथकाने केली असून प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आली आहे. ही घटना खोडसाळ कृत्य असण्याची शक्यता आहे, मात्र तपास सुरू आहे.”
देशविरोधी मजकूर पुसलेला आढळला
लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर धायकर यांनी सांगितले की, “गाडीत लिहिलेला ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि ‘आयएसआय’ असा मजकूर कोणीतरी पुसून टाकलेला होता. हा प्रकार जाणीवपूर्वक असावा की, त्यामागे काही मोठा कट आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.”
या घटनेनंतर जळगाव, भुसावळ, मनमाड, नाशिक आणि इतर प्रमुख स्थानकांवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. प्रवाशांची ओळखपत्रे तपासून गाड्यांमध्ये संशयित हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. रेल्वे प्रशासनाने “कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवावा आणि संशयास्पद गोष्टी तात्काळ कळवाव्यात” असे आवाहन केले आहे
भीतीचे वातावरण ; सुरक्षा यंत्रणा सज्ज
घटनेनंतर प्रवाशांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी, सुरक्षा दलांच्या तत्परतेमुळे परिस्थिती लवकर सामान्य झाली. तरीदेखील सर्व रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त सुरक्षा दल तैनात ठेवण्यात आले असून, तपास पूर्ण होईपर्यंत हाय अलर्ट कायम राहणार असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.








