जळगाव जीएमसी पथकाला यश
जळगाव (प्रतिनिधी) :- दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णावर लॅप्रोस्कोपीद्वारे शस्त्रक्रिया करून त्याला दुखापतीतून मुक्त करण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे वैद्यकीय पथकाला यश आले. याबद्दल अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी पथकाचे अभिनंदन करून रुग्णालयातून रुग्णाला निरोप देण्यात आला.
गणेश पाटील (रा. जळगाव) यांना गेल्या एक वर्षांपासून शौचाची जागा बाहेर आल्यामुळे त्रास होत होता. खाजगी दवाखान्यात येणारा खर्च हा लाखांत असल्याने तो झेपणारा नव्हता. त्याकरिता त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे तपासणी केली. तेथे सर्जरी युनिट ३ चे प्रमुख डॉ. रोहन पाटील यांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ल्ला दिला. त्यानुसार सर्व वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर रुग्णावर डॉ. रोहन पाटील यांच्या नेतृत्वात पथकाने “लॅप्रोस्कोपीक रेक्टल प्रोलॅप्स” शस्त्रक्रिया करून त्यांना दिलासा दिला. रेक्टल प्रोलॅप्स हि शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपीद्वारे करण्यात आली. यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ रुग्णाला मिळाला.
शस्त्रक्रिया सर्जरी युनिट ३ प्रमुख व सहयोगी प्राध्यापक डॉ. रोहन पाटील, डॉ. ईश्वरी भोबे, डॉ. झिया उल हक, डॉ. बिन्दूश्री, डॉ. जैद पठाण यांनी केली आहे. विभागप्रमुख डॉ. मारोती पोटे यांचे मार्गदर्शन लाभले. बधिरीकरण शास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. अमित हिवरकर, डॉ. सुभेदार यांच्यासह इंचार्ज परिचारिका सुरेखा महाजन, तुळसा माळी यांनी सहकार्य केले.
सदर प्रकारची शस्त्रक्रिया ही मुंबई येथील के ई एम हॉस्पिटल, जे जे हॉस्पिटल अशा प्रकारच्या रुग्णालयात केली जाते. परंतु खानदेशामध्ये सर्वप्रथम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णावरती यशस्वीपणे उपचार करून त्रासातून मुक्त करण्यात आले.
लॅप्रोस्कोपी सर्जन व सहयोगी प्राध्यापक डॉ. रोहन पाटील यांनी आवाहन केले आहे की, ज्या रुग्णांना लॅप्रोस्कोपीद्वारे उपचार जसे की, पित्ताशयामध्ये खडे होणे, अपेंडिक्स अशा प्रकारच्या आजारांवर लॅप्रोस्कोपीद्वारे उपचार करायचे असतील तर त्यांनी ओपीडीत सर्जरी विभागांमध्ये संपर्क साधावा. “रेक्टल प्रोलॅप्स” आजार हे बद्धकोष्ठतेमुळे होतात. तरी रुग्णांनी असे आजार टाळण्यासाठी अवेळी जेवण टाळा, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हिरवा भाजीपाला, फायबर याचे सेवन करा. तसेच बद्धकोष्ठता जर होत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांकडून उपचार घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.