जळगाव शहरातील घटना, केंद्रप्रमुख मसूद अहमद गंभीर
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील शिरसोली रोडवरील जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात अचानक मधमाशांचे पोळे उठले अन् त्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात एक विद्यार्थिनी जखमी झाली असून तिच्यासह प्रशिक्षणाला आलेले ५ उर्दू विद्यालयातील शिक्षकदेखील जखमी झालेले आहेत. एकूण ८ जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांची गर्दी होती. तर दुसरीकडे शिक्षक अभिवृद्धी क्षमता प्रशिक्षणासाठी आलेले होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक मधमाशांचे पोळे उठले. त्यातील यशश्री राजेंद्र गांगुर्डे (वय १९, शिव कॉलोनी, जळगाव) या विद्यार्थिनीच्या मागे मधमाशा लागल्या.(केसीएन)यशश्री पळत गेटच्या दिशेने धावली. तेथे प्रशिक्षण आटोपून गेटजवळ आलेले शिक्षण असोदा येथील मुख्याध्यापक सय्यद अखलाक मुश्ताक (वय ५४), शेख काकर (वय ४५, नशिराबाद उर्दू हायस्कुल), केंद्रप्रमुख मसूद अहमद शेख मन्सूर (वय ३८,नशिराबाद शाळा क्र. १), असीम खान मंजूर खान (वय ४०, नशिराबाद उर्दू शाळा) यांच्यामागेही मधमाश्यांचे पोळे लागले.
घटनेत सिद्धेश्वर हेमराज तायडे (वय २३), इकबाल खान रमजान खान (वय ५१), सुरक्षारक्षक युवराज विश्वनाथ सोनार (वय ५७) हे देखील जखमी झाले आहेत. घटनेत चारही शिक्षण जबर जखमी झाले. यात केंद्रप्रमुख मसूद अहमद यांना अधिक चावे घेतल्याने गंभीर झाले आहेत. तर घटनेप्रकरणी आजूबाजूच्या लोकांनी तत्काळ जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तेथे उपचार सुरु आहेत.(केसीएन) दरम्यान, उन्हाळा सुरु होताच मधमाश्या चावण्याचे प्रमाण वाढत आहे. बुधवारी असोदा शिवारात ५ जणांना तर गुरुवारी दि. ६ मार्च रोजी एरंडोल तालुक्यात एका शेतात २ वृद्धांना मधमाश्यांची चावे घेऊन जखमी केले आहे.