रायगड (वृत्तसंस्था) – मनी लॉंड्रिंग प्रकरणात येस बँकेचे संस्थापक तथा माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांच्यावर मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल झाल्याची बातमी समोर आल्यानंतर येस बँकेतील खातेधाराकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यातचं खातेधारकांवर बॅंक ठेवीतील 50 हजार रुपयांची रक्कम काढण्याची मर्यादा ठेवण्यात आल्याने. बँकेच्या पेण शाखेबाहेर खातेधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील रोहा- अष्टमी बँक, पेण अर्बन बॅंक, कर्नाळा बॅंक त्यानंतर पंजाब नॅशनल बॅंक व आता येस बॅंकेतील गैरकारभारामुळे जिल्ह्यातील नागरिकांचा बॅंक क्षेत्रावरील विश्वास उडला असल्याचे चित्र आहे. अनेकांच्या घरी विवाह कार्य, मुलांचे शिक्षण, कर्जाचे हप्ते अशा खर्चाच्या गोष्टी असून स्वतःचाच पैसा वापरायला मिळत नसल्याने खातेधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘पैसा घरात ठेवला तर चोरीला जायची भीती व बँकेत ठेवावा तर पैसा परत मिळण्याची शास्वती नाही,’ अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या. अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांनी कुठे जायचे असा सवाल येस बॅंकेचे खातेधारकं विचारत आहेत. सरकारने वेळीच या प्रकरणात लक्ष घालून खातेधारकांना पैसे त्वरीत मिळावेत यासाठी प्रयत्न करावेत अशी मगाणी जोर धरते आहे.