रावेर तालुक्यातील कुसुंबा खुर्द येथील घटना
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुसुंबा खुर्द येथे व्हरांड्यातील अँगलमुळे विजेचा धक्का लागून मंत्रालयातील सेवानिवृत्त आरोग्य विभागातील अव्वल सचिव जमशेर समशेर तडवी (वय ६२, रा. कुसुंबा खुर्द) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघड झाली आहे. रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ही दुर्घटना काल सकाळी १० वाजताच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी घडली. ते घराच्या समोरील व्हरांड्यात उभे असताना लोखंडी अँगलला स्पर्श झाला, त्यात विद्युत प्रवाह उतरल्याने त्यांना जोरदार शॉक बसला आणि ते खाली कोसळले. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती राजू गुलशेर तडवी यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सिकंदर तडवी करीत आहेत.