जिल्हा परिषद प्रशासनाची घोषणा
रावेर (प्रतिनिधी) :- तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून गट आणि गणरचनेची अधिकृत घोषणा झाली आहे. यात ६ गट आणि १२ गण निश्चित करण्यात आले असून प्रत्येक गटात चुरशीच्या लढती अपेक्षित आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून तालुक्यात सर्वत्र राजकीय हालचालींना वेग आला आहे.
ही निवडणूक भाजप आमदार अमोल जावळे यांच्यासाठी पहिलीच कसोटी असणार आहे. भाजपने सर्व जागांवर विजय मिळवून ताकद दाखवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तर काँग्रेसचे माजी आमदार शिरीष चौधरी, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या भागीदारीत सत्तेच्या समीकरणांना आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. रसलपूर-के-हाळे गटात भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश धनके यांच्या प्रभावामुळे ही जागा महत्त्वाची बनली आहे. मागच्या वेळी महिलेस संधी दिल्यानंतर यंदा पुरुष उमेदवाराला संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. प्रा. उमाकांत महाजन, चंद्रकांत पाटील, संदीप सावळे यांसह अनेक इच्छुक रिंगणात आहेत. येथील गटात भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांची मजबूत पकड आहे.
वाघोड-खिरवड गटात प्रचंड चुरस आहे. येथे माजी जि.प. अध्यक्षा रंजना पाटील यांच्या घरचा प्रभाव असून, त्यांच्या पतीसह अनेक स्थानिक नेते इच्छुक आहेत. जयश कुयटे आणि निलेश सावळे यांचीही भक्कम उपस्थिती असून, बहुरंगी लढतीची शक्यता आहे. सर्वच प्रमुख पक्षांचे उमेदवार येथून रिंगणात असतील. वाघोदा बु-थोरगव्हाण गट आणि ऐनपूर-तांदलवाडी हे दोन्ही गट मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात येतात. येथे आमदार चंद्रकांत पाटील, भाजप नेते नंदकिशोर महाजन आणि अरुण पाटील यांचा प्रभाव असून त्यानुसार उमेदवारांची निवड होणार आहे.
निंभोरा-विवरे गटात आर्थिक सक्षम उमेदवारांची गर्दी असून येथेही भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी व इतर गटांमधील चौरंगी लढत रंगणार आहे. खिरोदा प्र. यावल-चिनावल गटात माजी आमदार शिरीष चौधरी यांचा प्रभाव असून, काँग्रेससाठी ही जागा महत्त्वाची मानली जाते. आमदार अमोल जावळे यांनाही भाजपकडून विजयासाठी अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. या निवडणुकीत कोण कोणाच्या बाजूने राहील, कोण कुठे बंड करेल, हे पाहणे रंजक ठरणार आहे. स्थानिक प्रश्नांवरून मतदारांचा कौल कोणाला मिळतो, हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होईल.