जळगाव (प्रतिनिधी) – वडिलोपार्जित शेती मयत भावाच्या परिवाराच्या नावे करण्यासाठी तक्रारदारास ४ हजाराची लाच मागितल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खिरोदा येथील तलाठी व कोतवाल यांस गुरुवारी दि. ६ एप्रिल रोजी रंगेहाथ पकडले. यामुळे रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
खिरोदा येथील ६३ वर्षीय शेतकऱ्याने तक्रार दिली आहे. तक्रारदाराची वडीलोपार्जीत शेती खिरोदा तलाठी कार्यालयाचे हद्दीमध्ये आहे. तक्रारदार यांचे मोठे भाऊ मयत झालेले असल्याने सदर शेत जमीनीचे ७/१२ उताऱ्यावर मयत भावाची पत्नी व मुलगा यांचे नावे वारस म्हणून नोंद घेण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे तलाठी प्रमोद प्रल्हाद न्हायदे (वय-४५ वर्ष, रा. गणेश कॉलनी, फैजपूर) यांनी रुपये ४ हजार लाच मागितली होती.
तक्रारदाराने लाचलूपचत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार विभागाने गुरुवारी सापळा लावला. तलाठी प्रमोद न्हायदे व कोतवाल शांताराम यादव कोळी (वय-५२ वर्ष,खिरोदा) यांनी पंचासमक्ष ४ हजार लाचेची मागणी केली. सदर मागणी केलेली लाच रक्कम दोघेहि संशयितांनी पंचासमक्ष स्वतः सजा खिरोदा तलाठी कार्यालय, खिरोदा येथे स्वीकारली. म्हणून दोन्ही संशयित आरोपीतांविरुद्ध सावदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
कारवाईमध्ये पोलिस उप अधीक्षक शशिकांत पाटील, पोलीस निरीक्षक एस.के.बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ , पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर यांनी सहभाग घेतला.