जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
चंद्रकात कोळी
रावेर (प्रतिनिधी) : रावेर-पुनखेडा हा रस्ता अडीच ते तीन किमीचा असून या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. तसेच रस्त्याने ये-जा करणारे वाहनधारकाना वाहने चालवताना कमालीची कसरत करावी लागत आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे. अन्यथा मोठा अपघात झाल्यास त्याला कोण जबाबदार राहील असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.
रावेर-पुनखेडा हा अडीच ते तीन किमी अंतराचा रस्ता असून या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले असल्याचे चित्र आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडल्याने दिवसा तसेच रात्रीही वाहनधारकांना वाहने चालवताना कमालीची कसरत करावी लागते. ही रस्त्याची झालेली दुरावस्था तसेच वाहनधारकांचे होणारे हाल शासन, प्रशासन लक्ष देऊन थांबवतील का,असा प्रश्न वाहनधारक आणि परिसरातील नागरिकांना पडलेला आहे.
हा भाग केळी उत्पादकांचा असल्याने केळी भरण्यासाठी ये-जा करणारी वाहने,शेतकरी आणि शेतमजूर व स्कूल बस इतर ये-जा नागरिकांची दिवसभर या रस्त्यावरून वर्दळ सुरूच असते. रस्ता खराब झाला असल्याने या रस्त्यावर छोटे-मोठे अपघात नेहमीच होत आहेत. प्रशासन यांनी लक्ष देऊन रस्ता दुरुस्तीची मागणी वाहनधारक तसेच परिसरातील नागरिकांमधून होत आहे. या ठिकाणी मोठे अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.