नाराजांच्या मनधरणीसाठी संपर्क सत्र सुरूच…
जळगाव (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचे मंत्री तथा भाजपचे ‘संकटमोचक’ गिरीश महाजन यांना त्यांच्या जळगाव जिल्ह्यातच दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये पक्षातीलच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संकटात टाकल्याचे चित्र दिसून येत आहे. काहीजणांनी पक्षांतर केलं तर काहीजण पक्षांतराच्या वाटेवर आहे. देशभरात भाजपामध्ये प्रवेश सत्र सुरू असताना मात्र जळगाव जिल्ह्यात भाजपमधून बाहेर पडण्यासाठी कार्यकर्त्यांची रीघ दिसून येत आहे. त्यामुळे आता संकटमोचकच ‘संकटात’ असल्याचे चित्र असून आणखी काही पदाधिकारी व कार्यकर्ते भाजप सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यासाठी मंत्री महाजन यांनी नाराजांच्या मनधरणीसाठी संपर्क सत्र सुरूच ठेवले आहे.
देशभरात भाजपमध्ये विविध पक्षातून नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे प्रवेश सत्र सुरूच आहे. मात्र जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपामध्ये नाराज झालेले नेते, कार्यकर्त्यांसह अनेकांनी दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी आता लाईन लावली आहे. नुकतेच भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांच्यासोबत पारोळा येथील माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी देखील प्रवेश केला. त्यांच्यासह अनेक भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे देखील शिवसेना ठाकरे पक्षात गेले.
त्याचबरोबर आता जळगाव महानगरपालिकेतील काही नगरसेवक आणि रावेर मतदार संघातील काही पदाधिकारी व कार्यकर्ते हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांना स्वतःच्या बालेकिल्ल्यात कंबर कसून पक्ष वाचवण्यासाठी कामाला लागावे लागले आहे. जळगावच्या नगरसेवकांची नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यात, कोणीही पक्ष सोडून जायचे नाही अशी तंबी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
शिवसेना ठाकरे गटाने भाजपचा करण पवार यांना गळाला लावून त्यांना उमेदवारी दिली. त्याच प्रकारे रावेर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे भाजपच्या जळगाव पूर्व जिल्हाध्यक्षांना आपल्याकडे घेऊन त्यांना तिकीट देण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळे आता गिरीश महाजन यांची कसोटी लागली आहे. पक्षाच्या घोषित दोन्ही उमेदवारांविरुद्ध कार्यकर्त्यांची मोठी नाराजी आहे. ही नाराजी दूर करता करता आता वरिष्ठ पातळीवरील नेत्यांना दमछाक होऊ लागले आहे. मंत्री गिरीश महाजन हे दररोज नेते व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गिरीश महाजन यांच्या जी.एम. फाउंडेशन येथील भाजप कार्यालयात निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी बैठकांचे सत्र सुरूच आहे. तर दुसरीकडे गेले काही वर्ष मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री एकनाथरावं खडसे यांच्यात शाब्दिक शीतयुद्ध सुरू होते. ते युद्ध आता थांबून थेट एकनाथराव खडसेच भाजपमध्ये परत येणार असल्याची शक्यता दिसून आली आहे. त्यामुळे खडसे पक्षात आल्यावर महाजन यांची भूमिका नेमकी कशी राहील, पक्ष त्यांना काय भूमिका देणार ? यावर देखील आता नेत्यांचं, कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. एकनाथराव खडसे यांचा पुढील आठवड्यात भाजपामध्ये पुन्हा प्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे.