जळगाव (प्रतिनिधी) : सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी विविध पक्षांच्या नेत्यांच्या जिल्हा वाऱ्या सुरु झाल्या आहेत. काही ठिकाणी गोपनीय तर काही ठिकाणी पक्षांतर्गत खुल्या चर्चा सुरु झाल्या आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघात लेवा पाटीदार समाजाचे प्राबल्य पाहता व नवीन उमेदवार म्हणून डॉ. केतकी पाटील यांना तिकीट मिळण्याची शक्यता वाढली आहे. तसेच, रक्षा खडसे यांचे तिकीट कापले गेल्यानंतर मात्र त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) मध्ये प्रवेश करून पुन्हा एकदा खासदारकी लढण्याची शक्यता आहे.? त्यामुळे डॉ. केतकी पाटील विरुद्ध रक्षा खडसे असे प्रमुख लढतीचे चित्र रावेर मतदारसंघात रंगण्याची चिन्हे दिसून येत आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार बदल करण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून सर्वस्तरातून अभ्यास आणि पाहणी केल्यानंतर पक्षश्रेष्ठी निर्णय घेत आहेत. नुकतेच लोकसभा प्रभारी म्हणून जबाबदारी असलेले हंसराज अहिर यांनी उमेदवाराबाबत चाचपणी केली. प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली. संभाव्य उमेदवारांबाबत माहिती घेतली. त्याचा अहवाल श्रेष्ठींना पाठविला आहे. या मतदारसंघात भाजपकडून विधानसभा प्रभारी अमोल जावळे, विद्यमान खासदार रक्षा खडसे आणि डॉ. केतकी पाटील यांची नावे चर्चेत आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून लोकसभा मतदारसंघटिलो ३०० पेक्षा अधिक गावांमध्ये डॉ. केतकी यांनी संपर्क वाढविला आहे. तसेच, पक्षातर्फे यंदा उमेदवार बदलण्याबाबत जोरदार हालचाली सुरु आहे. मागील महिन्यात डॉ. केतकी यांच्यासह त्यांचे वडील काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. उल्हास पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
दुसरीकडे दोन टर्म खासदार राहिलेल्या रक्षा खडसे यांना भाजपा तिकीट नाकारण्याची चिन्हे दिसून येत आहेत. मात्र लेवा पाटीदार समाजाचे प्राबल्य पाहता व गेल्या दहा वर्षात केलेली विकास कामे पाहता रक्षा खडसे ह्या पुन्हा इच्छुक आहेत. भाजपाकडून तिकीट कट झाले तर त्या शरद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून शरद पवार यांच्यासोबत जाऊन शकतात. लोकसभेची रावेरची जागा हि शरद पवार गटाकडे सुटल्याने त्यांच्याकडे प्रबळ उमेदवार दिसून येत नाही. त्यामुळे रक्षा खडसे यांना राष्ट्रवादी (शरद पवार) गटाकडून तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे.? तसेच, एकनाथराव खडसे यांच्या परिवारातील असल्याने त्यांना तिकीट मिळू शकते.
एकंदरीत सर्व चित्र पाहता भाजपकडून डॉ. केतकी पाटील यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांचेकडून रक्षा खडसे अशी सक्षम लढत होण्याची शक्यता आहे. जामनेर, भुसावळ, रावेर, यावल येथे भाजप मजबूत आहे. इतर ठिकाणी मित्रपक्षाची मदत त्यांना होऊ शकते. तर यावल, रावेर, मलकापूर, चोपडा, मुक्ताईनगर, बोदवड अशा ठिकाणी महाविकास आघाडीची ताकद चांगल्यापैकी आहे. त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला होईल. याविषयी मतदारसंघात जोरदार प्रचार व चर्चा सुरु झाल्या आहेत.