जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील विद्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता नववीच्या नितीन सुरेश प्रजापत (रा.वाघनगर) या शालेय विद्यार्थ्याला रामानंदनगर पोलीस चौकाजवळबबुधवारी २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास ४८ हजार ५०० रूपये सापडले. विद्यार्थ्याने सापडलेले पैसे प्रामाणिकपणे रामानंदनगर पोलिसांकडे सुपूर्द केले. त्याचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वाघनगरातील नितीन हा बुधवारी २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास शाळेत जायला सायकलने निघाला. रामानंदनगर घाट चढल्यानंतर रामानंदनगर पोलिस चौकीजवळ त्याला पैशांचे बंडल दिसले. कुणाचे तरी पैसे पडले असतील म्हणून आधी त्याने त्या पैशांच्या मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतू, कुणीही दिसून आल्याने अखेर ते पैसे उचलून तो शाळेत आला. वर्गात जावून लागलीच त्याने वर्गशिक्षकांना संपूर्ण हकीकत सांगून सापडलेले पैसे त्यांच्याकडे सुपूर्द केले. नंतर ते पैसे पोलिसांकडे सुपूर्द करण्याचे ठरले. सायंकाळी नितीन हा वडील व शाळेतील शिक्षकांसह रामानंदनगर पोलिस ठाण्यात सापडलेले पैसे पोलिसांना सुपूर्द करण्यासाठी आला होता. पोलीस ठाण्यातील संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यावर त्याने रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्याकडे ते पैसे सुपूर्द केले. दरम्यान, त्याच्या प्रामाणिपणा पाहून पोलिसांनी नितीनचे कौतूक केले.