चोपडा तालुक्यातील धानोरा महामार्गावरील घटना
सुरेश पीतांबर महाजन (६२) असे मयत शिक्षकाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, असा परिवार आहे. ६ मे रोजी धानोरा परिसरात वादळी वाऱ्यामुळे अनेक वृक्ष कोसळले. अंकलेश्वर-ब-हाणपूर महामार्गावर धानोराहून चिंचोलीकडे जाताना गावाजवळच भला मोठा वृक्ष कोसळला आहे. याठिकाणी दुचाकीला अपघात होऊन त्यात निवृत्त शिक्षकाला आपला जीव गमवावा लागला आहे.
गेल्या २० दिवसांपासून हा वृक्ष तसाच पडून आहे. याच वृक्षामुळे शनिवारी रात्री १० वाजता चिंचोलीकडून घरी धानोऱ्याकडे येणारे मूळ धानोऱ्याचे रहिवासी व बिडगाव विद्यालयाचे निवृत्त शिक्षक एस. पी. महाजन यांची दुचाकी या वृक्षावर धडकली व अपघात झाला. त्यात त्यांच्या मेंदूला जोरदार मार लागला. त्यांना तत्काळ धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. मयत शिक्षक महाजन हे खो-खोचे राज्यस्तरीय पंच, तसेच धानोरा विविध कार्यकारी सोसायटीचे संचालकही होते.