जळगावात एमआयडीसी परिसरात घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील रिमांड चौफुली परिसरात चार अनोळखी तरुणांनी एका व्यापाऱ्याला रस्त्यात अडवून शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत संबंधित व्यक्तीस दुखापत झाली असून या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद संजय रामगोपालजी तापडिया (वय ५६, रा. रूम नं. १०२, श्री हाइट, काशिनाथ लॉज मागे, जळगाव) यांनी दिली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, १७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास रेमंड चौफुली येथील मारुती मंदिरासमोर चार अनोळखी तरुणांनी “रिक्षाला कट का मारला?” असे म्हणत वाद घातला.
त्यानंतर आरोपींनी फिर्यादीचा रस्ता अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी त्यातील एका आरोपीने कठीण वस्तूने फिर्यादीच्या डोक्यावर वार करून दुखापत केली. तसेच शिवीगाळ व दमदाटी केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही आरोपी अनोळखी असून त्यांचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेचा तपास पोहेकॉ रामदास कुंभार करीत आहे.









