चाळीसगाव तालुक्यात सायगाव येथील प्रकरणाकडे वेधले लक्ष
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात सायगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश रोकडे यांनी जिल्हा परिषद सीईओ मीनल करनवाल यांच्यासमोर राष्ट्रीय पेयजल योजनेच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मागणीबद्दल थेट प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी केली. आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात रोकडे यांनी गावातील ही महत्त्वाची योजना केवळ कागदोपत्रीच राहिली असल्याचा आरोप केला.
रोकडे यांनी सीईओ करनवाल यांना विचारणा केली, “राष्ट्रीय पेयजल योजना वर्षानुवर्षे केवळ कागदावरच आहे. प्रत्यक्षात गावकऱ्यांना तिचा लाभ मिळालेला नाही. या योजनेचे काम नेमके कुठे थांबले आहे आणि त्यासाठीचा निधी कुठे खर्च झाला, याची सखोल चौकशी झाली पाहिजे.” त्यांच्या या प्रश्नामुळे काही काळ सभागृहात शांतता पसरली. तेथील शासकीय अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही. हा मुद्दा गंभीरतेने घेत सीईओ मीनल करनवाल यांनी या प्रकरणी आवश्यक चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमात विविध विकास कामांची माहिती आणि आश्वासने दिली जात असताना, रोकडे यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे उपस्थितांनी ग्रामस्थांच्या मनातील खदखद समोर आणल्याचे मत व्यक्त केले. उपस्थित गावकऱ्यांनीही या मागणीला पाठिंबा देत योजनेची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली.