जळगाव (प्रतिनिधी) – वर्षानुवर्ष प्रलंबित राहणारे खटले, आर्थिक चणचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टी टाळण्यासाठी व आप-आपसात सामोपचाराने तडजोड घडवून वाद मिटवून घेण्याकरीता ९ डिसेंबर रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे देण्यात आली आहे. महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण दिलेल्या निर्देशानुसार विधी सेवा प्राधिकरण व जळगाव जिल्हा वकिल संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही राष्ट्रीय लोकअदालत होईल.
जळगाव येथे जिल्हा व सत्र न्यायालयाचे आवारात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. क्यु.एस.एम. शेख यांचे अध्यक्षतेखाली लोकअदालतीस प्रारंभ होईल. या लोकअदालतीसाठी जिल्हा वकिल संघ, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांचे सहकार्य लाभणार आहे. राष्ट्रीयकृत बँका, कंपन्या यांचे प्रलंबित असलेल्या दिवाणी व फौजदारी खटल्यांमध्ये मोठया प्रमाणात रक्कम वसूली होवून मिळण्याची शक्यता आहे. वादपूर्व खटल्यामध्ये बॅंका व कंपन्या यांनी थकित रकमेमध्ये सुट देण्याबाबत प्रस्तावित केलेले आहे. तरी याबाबत नागरिकांनी लाभ घ्यावा. ऐनवेळी ज्या पक्षकारांना आपले खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवावयाचे असतील त्यांना सुद्धा ऐनवेळी खटले निकाली काढण्याची संधी देण्यात आलेली आहे. तरी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त खटले ९ डिसेंबर रोजीच्या राष्ट्रीय लोकअदालतीत सामोपचाराने निकाली काढावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवांनी यांनी केले आहे.