जळगाव ( प्रतिनिधी ) – जैन हिल्स येथे संपूर्ण भारतासह विदेशातून ११ वर्षाखालील बुद्धिबळ खेळाडूंनी सहभाग घेतला. ५३८ खेळाडूंसह त्यांच्या पालकांची व्यवस्था उत्तमरित्या जैन इरिगेशनच्या माध्यमातून होत आहे. जळगावात होणाऱ्या ३८ राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतून क्विन दिव्या देशमूखसह गुकेश डोम्माराजू सारखे खेळाडू घडतील, तसा खेळ खेळाडूंकडून घडेल आणि देशाचे नाव जगभर बुद्धिबळमध्ये उंचावेल असा विश्वास व्यक्त करत खेळाडूंनी चिकाटी ठेऊन मेहनत केली पाहिजे असा प्रेरणादायी संवाद ग्रॅण्डमास्टर अभिजीत कुंटे यांनी सहभागी खेळाडूंशी साधला.
३८ वी बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीच्या उद्घाटनप्रसंगी अभिजीत कुंटे बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या विश्वस्त सौ. ज्योती अशोक जैन उपस्थित होत्या. त्यांच्यासमवेत महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर, महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले, कोषाध्यक्ष विलास म्हात्रे, मुख्य पंच देवाशीष बरूआ उपस्थित होते. दरम्यान दुपारच्या फेरीच्या उद्घाटनाप्रसंगी प्रिती अग्रवाल यांच्यासह जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मार्गदर्शनात होत असलेल्या या स्पर्धेसाठी जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड कंपनीने प्रायोजकत्व स्विकारले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील पाच वर्षाचा वल्लभ अमोल कुलकर्णी तसेच आठ वर्षाखालील आशियाई विजेता अद्वित अग्रवाल, १० वर्षाखालील पश्चिम बंगाल मधील विश्वविजेता मनिष शरबातो, ७ वर्षाखालील जागतीक स्कूल गेम विजेती प्रणिता वकालक्ष्मी यासह युएई, अबुधाबी, जर्मनी, मलेशिया येथील भारतीय वंशाचे १४ खेळाडूंसह ५३८ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.