नागपूर ( वृत्तसंस्था) – येत्या काही महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार का? यावर अद्याप संभ्रम आहे. महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष स्वबळाची भाषा करत आहे.
परंतु आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच आगामी महापालिका निवडणुकांबाबत मोठं भाष्य केले आहे.
नागपुरातील कार्यक्रम संपल्यानंतर शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी शरद पवार म्हणाले की, नागपूर महानगरपालिका निवडणूकीत एकत्र लढणार का? हे आत्ताच सांगता येणार नाही पण आघाडी केलेले पक्ष एकत्र लढले तर फायदा होईल. आगामी निवडणुकांमध्ये आघाडी केलेले पक्ष एकत्र आले तर योग्य आहे. नाही तर एकटं लढू असा इशाराच शरद पवारांनी काँग्रेस आणि शिवसेनेला दिला आहे. त्यामुळे पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
एसटीचा संप तुटेपर्यंत ताणू नये असं सांगत शरद पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केले आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या, काही प्रश्न सोडवावे लागेल. एसटी महामंडळांचं विलीगीकरण लगेच शक्य नाही असं शरद पवारांनी सांगितले आहे.
मंत्री नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. मंत्री नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असणारे पुरावे मी शरद पवारांना देणार असं फडणवीस म्हणाले होते. त्यावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, मलिकांविरोधात पुरावे देऊ असं म्हणणाऱ्यांनी पुरावे अजून दिले नाहीत. बेछूट आरोप करायचे आणि त्याला सामोरं जायचं नाही. अनिल देशमुखांना कोठडीत जावं लागलं. काहीही संबंध नसताना त्यांना कोठडीत जावं लागतं हा त्यांच्यावर अन्याय आहे असं सांगत पवारांनी भाजपावर निशाणा साधला आहे. तसेच महात्मा गांधींना साऱ्या जगाने स्वीकारले असं सांगत अभिनेत्री कंगना रणौतच्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया दिली.