जळगाव (प्रतिनिधी) : येथील चाळीसगाव तालुक्यात बिलाखेड येथे घरात एकटी असलेल्या अल्पवयीन बालिकेवर चुलतभावानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे.
आठ वर्षीय पीडित बालिकेचे आई- वडिल शेत मजुर आहेत. बालिकेचे आई- वडिल रविवारी १८ रोजी दोघेही मजुरीच्या निमीत्ताने घराबाहेर पडले. दुपारी तीन ते पाच वाजेच्या दरम्यान पीडित मुलगी घरी एकटी असतांना चुलतभाऊ असलेला संशयित आरोपी गोरख भिमराव सोनवणे (वय २४, रा. बिलाखेड) याने चुलतबहीण असलेल्या बालिकेचे अपहरण करत बिलाखेड शिवारात ओसाड जागी झाडाझुडपात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. सायंकाळी बालिकेने आई- वडिल आल्यावर घडलेला सर्व प्रकार सांगितला. घटना सोमवारी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल झाली.
जिल्ह्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटना एका मागून एक उघडकीस येत आहेत. संशयित गोरख सोनवणे विरुद्ध पॉक्सो कायदा, कलम ३७६ दाखल करण्यात आले आहे. गोरख सोनवणे याचे लग्न झाले आहे. याप्रकरणी पीडित बालिकेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गोरख सोनवणे याच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर भामरे हे करीत आहेत.