अमळनेर येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : धुळे रोडवर बाजार समितीजवळ रंगांच्या व प्लायवूडच्या दुकानाला शॉर्ट सर्किटने आग लागून सुमारे साडे १२ लाखाचे नुकसान झाल्याची घटना दि. १३ रोजी सकाळी घडली. अग्निशमन दलाने वेळीच आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला. यात व्यावसायिकाचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
शुभम पवार यांच्या श्रीदत्त हार्डवेअरला आग लागल्याची माहिती सकाळी पवार यांना मिळाली. त्यांनी दुकान उघडून ताबडतोब अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्याठिकाणी विद्युत प्रवाह सुरू असल्यामुळे वायरमन आकाश वाडीले याने वीजपुरवठा बंद केला. अग्निशमन दल प्रमुख दिनेश बिऱ्हाडे , फारुख शेख, जफर पठाण, भिकन पठाण, मच्छिन्द्र चौधरी यांनी तातडीने आग विझवल्याने आजूबाजूच्या दुकानांना आग लागू शकली नाही. मात्र पवार यांच्या दुकानातील सर्व ऑईलपेंट, रंग तयार करण्याचे मशीन, सर्व प्लायवूड जळून खाक झाले होते. शुभम पवार यांचे सुमारे साडेबारा लाखाचे नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे पहाटे दोन वाजेच्या सुमारास आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरु होते.