जळगावात दुपारी घडली घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरांमधील रामेश्वर कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी समोर आली आहे. हर्षल उत्तम माळी (वय २३) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हर्षल माळी हा व्यवसायाने इलेक्ट्रिशियन होता. मंगळवारी, २० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्याने घरात कुणी नसताना गळफास घेतला. हर्षलचे वडील भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. दुपारी काम आटोपून वडील जेव्हा घरी परतले, तेव्हा त्यांना हर्षलने गळफास घेतल्याचे दिसून आले. हा प्रकार उघडकीस येताच परिसरात मोठी खळबळ उडाली.
हर्षल हा तरुण वयाचा असल्याने त्याच्या मृत्यूमुळे माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. हर्षलने टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आत्महत्येचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.









