पालकमंत्र्यांसह शासकीय अधिकाऱ्यांची शिष्टाई अपयशी
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील रामदेववाडी येथील ग्रामस्थांनी सोमवार दि. १३ मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या गावातील केंद्रावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे रामदेववाडी येथील एकही नागरिकाने मतदान केले नाही. याकरिता दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच सोमवारी धरणगाव तहसीलदारांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांची शिष्टाई अपयशी ठरली असून ग्रामस्थांनी पूर्ण बहिष्कार कायम ठेवला. यामुळे लोकशाही उत्सवाला गालबोट लागले आहे.
भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने आईसह तिच्या दोन मुलांचा व भाच्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी नुकतीच रामदेववाडी गावाजवळ घडली होती. पोलिसांनी कार चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला असला तरी चालकासह कारमधील अन्य दोघांना अद्याप अटक मात्र झालेली नाही. त्यामुळे दोषींना अटक होत नाही तोपर्यंत मतदान करणार नसल्याच्या निर्धार रामदेववाडीच्या ग्रामस्थांनी केला होता. प्रत्यक्षात सोमवारी एकाही ग्रामस्थाने तिथे मतदानाचा हक्क बजावला नाही.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर रामदेववाडी येथील ग्रामस्थांनी बहिष्कार टाकल्याची माहिती समजताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराज ग्रामस्थांची बैठक घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न देखील केला. पण काहीच उपयोग झाला नाही. ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या बाबतीत ठाम राहिले. त्यामुळे तेथील मतदान केंद्रावर कोणीच फिरकले नाही.