भुसावळ (प्रतिनिधी) – पेन्शनची रक्कम बँकेतून काढून घरी नेत असताना एकाने हातचालाकी करून वृद्ध महिलेच्या हातातील दहा हजार रुपयांची रक्कम घेऊन पसार झाल्याची घटनाघडली आहे. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बेगमबी अब्दुल शेख (वय – ६५) रा. जाम मोहल्ला मशिदीजवळ, भुसावळ या वयोवृद्ध महिला आपली पेन्शन घेण्यासाठी भुसावळ शहरातील एसबीआयच्या मुख्य शाखेत आल्या होत्या. सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास त्यांनी बँक खात्यातून १० हजार रुपयांची रोकड काढली. त्यानंतर एक अज्ञात अनोळखी भामटा वृद्ध महिलेजवळ येऊन नोटांवरील नंबर लिहून घेण्याचा बहाणा केला. त्यानंतर हातचालाकीने त्यांच्या जवळील दहा हजार रुपयांची रक्कम घेऊन पसार झाला. यानंतर वृद्ध महिलेने तातडीने भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय नेरकर करीत आहे.