जळगाव पॅटर्नचा राज्यभर अंमल
जळगाव (प्रतिनिधी) : शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, अनुदानित व खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रगतीत सक्रिय सहभाग घेता यावा, शाळेशी भावनिक नाते घट्ट व्हावे आणि सामाजिक बांधिलकी जपली जावी या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयाची पायाभरणी मात्र जळगाव जिल्हा परिषदेच्या नाविन्यपूर्ण प्रयोगातून झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ४ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात जिल्ह्यातील शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ राबविण्याची संकल्पना जाहीर केली होती. सध्या जळगाव जिल्ह्यात २० पेक्षा अधिक माजी विद्यार्थी संघ यशस्वीपणे कार्यरत असून, त्यांच्या उपक्रमामुळे शाळांच्या विकासात सकारात्मक बदल दिसून येत आहेत. हाच “जळगाव पॅटर्न” आता संपूर्ण राज्यात अंमलात येणार आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार माजी विद्यार्थी संघामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, मुख्याध्यापक/प्राचार्य सचिव म्हणून असतील.
•एक पालक प्रतिनिधी, निवृत्त अधिकारी व शिक्षक सल्लागार सदस्य म्हणून सहभागी होतील.
•प्रत्येक शाळेला वर्षातून किमान एकदा माजी विद्यार्थी मेळावा व स्नेहसंमेलन घेणे बंधनकारक असेल.
•गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, ईद, ख्रिसमस यांसारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर हे कार्यक्रम आयोजित केले जातील.
या कार्यक्रमांमध्ये माजी विद्यार्थ्यांचा सत्कार, शाळेचा विकास आराखडा, शिक्षक सन्मान व विविध सांस्कृतिक उपक्रम राबविले जातील. तसेच शाळेच्या भौतिक सुविधांच्या उभारणीत माजी विद्यार्थी मार्गदर्शन व सहकार्य करतील.
•विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, शिष्यवृत्ती व प्रेरणा दिली जाईल.
•पर्यावरणपूरक आणि सामाजिक उपक्रमांना चालना दिली जाईल.
राज्य सरकारने यासाठी विशेष ऑनलाइन नोंदणी प्रणाली तयार केली असून, त्यावर प्रत्येक माजी विद्यार्थ्यांची नोंदणी होणार आहे. शाळांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांचे फोटो व अहवाल या पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य असेल. जळगाव जिल्ह्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग आता राज्यभर झळकणार असल्याने, जळगाव पॅटर्नने शिक्षण क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे.