जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील एम जे महाविद्यालयाचे जे विद्यार्थी यंदा राज्य लोक सेवा आयोगाची परीक्षा देणार आहेत अशा एमएच्या विद्यार्थ्यांची अभ्यासक्रमातील पेपर नंतर घेण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे .
एम.जे कॉलेजच्या एमएच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे . २३ जानेवारीरोजी एम जे महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्याचे (कला शाखेचा ) पेपर होणार आहे. त्याच दिवशी राज्य लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन पदाधिकाऱ्यांनी व सकाळ यिन कॉलेज अध्यक्ष यांनी प्राचार्यांची भेट घेतली व सर्व विद्यार्थ्यासाठी एम.ए.च्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या , अशी विनंती केली होती . प्रा.भारंबे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांचे कुठलेही नुकसान होणार नाही अशी ग्वाही दिली .या कॉलेज कडून सोमवारी एक गुगल फॉर्म प्रसारित केला जाणार आहे. त्यावर विद्यार्थ्यांनी माहिती भरून तो फॉर्म भरावा ही माहिती संकलित करून अशा विद्यार्थ्यांची परीक्षा महाविद्यालय नंतर घेणार आहे. यावेळी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे जिल्हाअध्यक्ष रोहन महाजन व सकाळ यिनचे कॉलेज अध्यक्ष भावेश पाटील, पवन पाटील, ऋषिकेश देशमुख आदी उपस्थित होते.