पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांचे आदेश
भुसावळ (प्रतिनिधी) :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपाइं(आठवले गट) जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्यासह पाच जणांच्या टोळीस जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. या आशयाचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले आहेत.
राजू सूर्यवंशी, किशोर सूर्यवंशी, आनंदा सूर्यवंशी, कैलास उर्फ छोटू भागवत सूर्यवंशी, रोहन सूर्यवंशी या पाच जणांचा हद्दपार झालेल्यांमध्ये समावेश आहे. सुरुवातीला सात जणांविरुद्ध प्रशासनाने पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव पाठविला होता.
या प्रस्तावानुसार सातपैकी पाच जणांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. बाजारपेठ पोलिसांनी राजू सूर्यवंशीसह ७ जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे पाठविले होते. त्याच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलिस, बाजारपेठ आणि वरणगाव पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. यात बाजारपेठ पोलिस ठाण्यात ९ गुन्हे दाखल आहेत.
पाचही जणांना दोन दिवसांत शहर व जिल्हा सोडून जायचे आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. जेथे जातील तेथील पोलिस ठाण्यात हजेरी लावायची आहे. राज्याबाहेर जाणार असल्यास दहा दिवसांत संबंधित पोलिस ठाण्यात सूचित करावे लागणार आहे, असेही आदेशात म्हटले आहे.