डॉ. दीपकसिंग राजपूत यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट
जळगाव ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्रातील राजपूत समाजाच्या प्रलंबित प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी युवा नेते डॉ. दीपकसिंग राजपूत यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान राजपूत समाजाच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नांकडे सकारात्मकतेने पाहण्याचे आश्वासन दिले आहे.

भेटीच्या सुरुवातीला डॉ. दीपकसिंग राजपूत यांनी देवेंद्र फडणवीस यांना ‘श्रीमद्भगवतगीता’ आणि पारंपारिक शाल देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. या प्रसंगी दोन्ही नेत्यांमध्ये समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरक्षणाशी संबंधित विविध विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. यावेळी डॉ. राजपूत यांच्यासोबत सुबोधसिंग व इतर मान्यवर उपस्थित होते. डॉ. राजपूत यांच्या कार्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
“मुख्यमंत्र्यांसोबत झालेली ही चर्चा राजपूत समाजाच्या न्याय्य हक्कासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या आश्वासक भूमिकेमुळे समाजाच्या मागण्या लवकरच पूर्ण होतील, अशी आम्हाला खात्री आहे.”
— डॉ. दीपकसिंग राजपूत









