राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा खळबळजनक आरोप
जळगाव (प्रतिनिधी) : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर शुक्रवारी दि. १६ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने पत्रकार परिषद घेतली. एकनाथरावं खडसे स्वार्थी आहेत. त्यांनी भूतकाळात मंत्रीपदाचा वापर करून विविध पदे त्यांच्या घरामध्ये ओढून घेतली. वयाच्या ८४ व्या वर्षी शरद पवार यांचा विश्वासघात करून भाजपाकडून सुनेला तिकीट मिळवून घेतले असा खळबळजनक आरोप जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी आहे.
पत्रकार परिषदेला महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. एकनाथराव खडसे यांनी लेवा पाटीदार समाजात देखील ठेकेदार म्हणून काम केले. हरिभाऊ जावळे यांना तिकीट मिळाले नाही, तेव्हा खडसे काही बोलले नाही. आता म्हणे, लेवा समाजावर अन्याय झाला असे सांगतात. आज राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर सांगितले की मी कधीही भाजपमध्ये जाऊ शकतो. म्हणजे यांची निष्ठा नेमकी कोणासोबत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे, असेही संजय पवार यांनी टिका केली.
खडसेंनी मंत्रीपदाचा वापर केवळ स्वार्थासाठी घेतला. घरामध्ये त्यांनी पदे पदरात पाडून घेतली. आता देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटांमध्ये रवींद्र पाटील, सतीश पाटील, गुलाबराव देवकर असे विविध गट गट त्यांनी निर्माण केले आहेत. सहकारात त्यांनी अनेक लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी नेमकी निष्ठा कोणाशी हे सिद्ध करावे, असे देखील संजय पवार हे पत्रकार परिषदेत म्हणाले.