उमेदवार ललितकुमार घोगले यांच्या प्रचार फेरीला मोठा प्रतिसाद
जळगाव प्रतिनिधी : जळगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. रविवारी, दि. ५ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रभाग क्रमांक १२ मध्ये भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. या फेरीच्या निमित्ताने पक्षाने परिसरात मोठे शक्तीप्रदर्शन केले. १२अ मधील उमेदवार ललितकुमार घोगले यांच्या प्रचार फेरीला मोठा प्रतिसाद मिळाला.


सकाळी एम. जे. कॉलेज परिसरातून या प्रचार फेरीला उत्साहात सुरुवात झाली. त्यानंतर ओंकारेश्वर मंदिर आणि सागर पार्क या मुख्य परिसरांमध्ये ही फेरी काढण्यात आली. “तुतारी वाजवणारा माणूस” हे चिन्ह घराघरांत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. ठिकठिकाणी मतदारांशी संवाद साधत उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.

या प्रचार फेरीत पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने संतोष चौधरी (माजी आमदार), प्रमोद पाटील (जिल्हाध्यक्ष), एजाज अब्दुल गफ्फार मलिक (महानगराध्यक्ष), माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, रमेश पाटील या नेत्यांनी मतदारांना अभिवादन करत प्रभाग १२ च्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला (शरदचंद्र पवार पक्ष) साथ देण्याचे आवाहन केले.

प्रभाग १२ अ मधील पक्षाचे अधिकृत उमेदवार ललित कुमार रामकिशोर घोगले आणि पवार सुरेश पोपट यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. परिसरात ठिकठिकाणी उमेदवारांचे स्वागत करण्यात आले, ज्यामुळे या प्रभागात पक्षाची पकड मजबूत असल्याचे दिसून आले.









