दादा भुसे, गोगावले यांना पालकमंत्री न करणे महायुतीला गेले जड !
जळगाव (विशेष प्रतिनिधी) : बहुप्रतिक्षित पालकमंत्री पदाच्या निवडी अखेर शनिवारी जाहीर करण्यात आल्या. मात्र यामुळे महायुतीमध्ये मोठे तणाव निर्माण झाले आहे. यातूनच आता रविवारी रात्री शासनाच्या उपसचिवांच्या सहीने पत्र काढून रायगड व नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या निवडीला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन व अदिती तटकरे यांची पालकमंत्रीपदाची निवड आता थांबली आहे.
महायुती सरकारने सत्ता स्थापन केली खरी, मात्र सत्ता स्थापन झाल्यापासून तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये सुंदोपसूंदी सारखी सुरू आहे. यातच मंत्रिमंडळ निर्माण करणे, मंत्र्यांची निवड करणे, त्यांचा शपथविधी, खातेवाटप या सगळ्यांना महायुतीला खूप वेळ घ्यावा लागला होता. त्याच पद्धतीने पालकमंत्री पदाच्या निवडी देखील रखडल्या होत्या. अखेर शनिवारी दि. १८ जानेवारी रोजी जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर झाले. मात्र यात देखील महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना व अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या प्रत्येकी ३ मंत्र्यांना एकही जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले नाही.
शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते भरत गोगावले आणि दादा भुसे या कॅबिनेट मंत्र्यांसह अजितदादा पवार गटाचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे आणि दत्तात्रय भरणे यांना कुठलेही जिल्हे वाटप न झाल्यामुळे चर्चा सुरू झाली होती. रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एकमेव आमदार असलेल्या अदिती तटकरे यांना पालकमंत्री पद मिळाले. मात्र तेथे शिवसेना व भाजपचे प्रत्येकी तीन आमदार आहेत. तसेच त्या ठिकाणी भरत गोगावले यांना पालकमंत्री पद मिळण्यासाठी स्थानिक आग्रही होते. मात्र पालकमंत्री पद मिळत नसल्याचे समजताच अखेर गोगावलेंनी कुठलाही जिल्हा घेतला नाही, अशी माहिती मिळाली आहे.
अशातच पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी गोगावले व भुसे यांना पालकमंत्री पद न दिल्यामुळे देखील नाराजी व्यक्त केली होती. त्याच पद्धतीने नाशिक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एकूण ७ तर भाजपचे ५ आमदार आहेत. तरीदेखील तेथे नाशिक जिल्ह्यातील नसलेले व भाजपचे संकटमोचक मानले जाणारे जळगाव जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपद देण्यात आले. यामुळे नाराजीचा सूर जाहीरपणे उमटत आहे. त्यातच दादा भुसे यांना पालकमंत्रीपद अपेक्षित होते. मात्र त्यांनीदेखील पालकमंत्री पद मिळत नसल्याचे पाहत कुठलेही जिल्हे मला देऊ नका असे सांगितल्याची माहिती मिळाली आहे.
यामुळे अखेर राज्य शासनाला रविवारी दि. १९ जानेवारी रोजी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दिलीप देशपांडे यांच्या सहीने नाशिक व रायगड या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्याबाबतचे आदेश काढावे लागले आहेत. त्यातच गोंधळ म्हणजे रविवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ध्वजारोहण करणाऱ्या मंत्रिमहोदयांची यादी देखील शासनाने जाहीर केली आहे. यात रायगड व नाशिक जिल्ह्याचे ध्वजारोहण हे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन आणि आदिती तटकरे हे करतील असे राज्य शासनाने पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
आता हे पत्रक पुन्हा एकदा सुधारित करून नाशिक व रायगड जिल्ह्याचे ध्वजारोहण कोणते मंत्री करतील किंवा या दोन्ही जिल्ह्यांचे ध्वजारोहण ठरल्याप्रमाणे अनुक्रमे गिरीश महाजन आणि अदिती तटकरे हेच करतील काय हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित जिल्हा प्रशासनाच्या पुढे मात्र यामुळे मोठा पेच दिसून येत आहे. महायुतीमधील तणाव आता स्पष्ट दिसू लागला आहे. दुसरीकडे विविध योजनांवर अधिक खर्च झाल्यामुळे वित्त विभागावर देखील ताण आलेला असल्याची माहिती महायुतीमधील सूत्रांकडून मिळाली आहे.