राजकीय वर्तुळाचे तहसील कार्यालय परिसरात राहणार लक्ष
जळगाव (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात राजकीय वातावरण प्रचंड तापलेले आहे. जिल्ह्यातील ११ मतदारसंघात अधिकृत व अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर आज माघारीच्या अंतिम दिवशी लढतींचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. काही मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेली बंडखोरी पक्षासाठी डोकेदुखी ठरली आहे. पक्षाचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांची आज खरी परीक्षा असून किती बंडखोर कार्यकर्त्यांना ते माघार घेण्यासाठी मनधरणी करू शकतात याकडे महायुतीच्या नेत्यांचे लक्ष लागून आहे.
राज्यात पुन्हा सत्तेत येण्यासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांना बहुमतापेक्षा अधिक जागा निवडून आणण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यासाठी अडथळा म्हणजे काही भाजपचे बंडखोर कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी महायुतीच्याच उमेदवारांविरुद्ध दाखल केली आहे. आज दि. ४ नोव्हेंबर रोजी अर्ज माघारीची अंतिम तारीख असून दुपारी ३ वाजेपर्यंत किती बंडखोर अपक्ष माघार घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
भारतीय जनता पक्षाचे मंत्री गिरीश महाजन यांची राज्यभरात संकटमोचक म्हणून ओळख आहे. जिल्ह्यात जळगाव शहर, एरंडोल, पारोळा, पाचोरा, अमळनेर अशा महत्त्वाच्या ठिकाणी बंडखोरी उफाळून आली आहे. त्यात चोपड्यामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून उमेदवारी देखील मिळवली आहे. आता भाजपचे संकटमोचक हे बंडखोर उमेदवारांना माघार घेण्यासाठी कशी मनधरणी करतात हे आज समजून येणार आहे. काहींना फोनवर संपर्क केले, काहींना प्रत्यक्ष बोलावले होते. मनधरणी सुरू आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी तीन दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. मात्र आज संकटमोचकांची खरी परीक्षा असून बंडखोर कार्यकर्ते माघार घेतील काय असा प्रश्न आता महायुतीचे अधिकृत उमेदवारांचे कार्यकर्ते विचारू लागले आहेत.