खा. संजय राऊत यांच्या माहितीमुळे “मविआ”त खळबळ
जळगाव (विशेष प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांची रविवारी दि. ६ रोजी जळगावात पत्रकार परिषद झाली. परिषदेत खा. राऊत यांनी जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा मशाल अर्थातच शिवसेना उबाठा पक्ष लढणार असल्याचे सांगितले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर यांची उमेदवारी कट झाली कि काय याबाबत चर्चा सुरु झाली आहे. खा. राऊत यांच्या माहितीने महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे.
शिवसेनेचे खा. संजय राऊत सध्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात रविवारी ते जळगावला आले होते. त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केल्या. तसेच, विधानसभा निवडणुकीविषयी विस्तृत चर्चा करण्यात आली.(केपीएन)प्रसंगी सकाळी त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात भरपूर सभा घेत आहेत. याचे कारण काय ? महाराष्ट्रात आता महाविकास आघाडीला बहुमत आगामी काळात मिळणार असल्याने मोदींना स्वतः भाजपच्या प्रचारासाठी यावे लागत असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणांविषयी देखील खा. राऊत यांनी टीका केली. त्यांना भाषण लिहून देणारे पंतप्रधान पदाची गरिमा नष्ट करीत आहेत.
मोदींनी लक्षपूर्वक भाषणे दिली पाहिजेत असेही ते म्हणाले. जळगाव ग्रामीणच्या जागेविषयी विचारले असता, हि जागा शिवसेना उबाठा लढणार असल्याचेहि त्यांनी सांगितले. या मतदारसंघात बाळासाहेब ठाकरेंचा कार्यकर्ता विजयी होत आला आहे, यंदाही आमचा उमेदवार विजयी होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.(केपीएन)त्यासाठी उमेदवार आयात किंवा निर्यात करावा लागला तरी चालेल, असेही खा. राऊत म्हणाले. यामुळे ग्रामीण मतदारसंघासाठी तयारी करीत असलेले गुलाबराव देवकर यांची उमेदवारी आता कट झाली काय या चर्चेला उधाण आले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात आता मशाल या चिन्हावर कोणता उमेदवार टक्कर देणार हे पाहण्यासारखे राहणार आहे.