नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कॉंग्रेस शासित राज्यांतही महिला आणि अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि खूनाच्या घटना घडत असताना, कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका वड्रा यांनी आपले राजकीय दौरे बंद करुन पिडीतांच्या कुटुंबियांनी भेटण्याची प्राथमिकता दाखवा, असा सल्ला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॉंग्रेसच्या या दोन नेत्यांना दिला आहे.

पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील सहा वर्षांच्या दलित मुलीच्या कथित बलात्कार आणि हत्येप्रकरणी कॉंग्रेसचे नेते संवेदनशील नसल्याचे दिसून आल्याचे सांगून जावडेकर पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणावेळी देशभर रान उठवणाऱ्या या नेत्यांनी संवेदनशीलता आता कुठे गेली?
राजस्थान आणि पंजाब या राज्यांतील बलात्काराच्या घटनांबाबत तेथील कॉंग्रेस सरकारे संवेदनशील का नाहीत, हेही राहुल-प्रियंका यांनी स्पष्ट करावे. राजस्थान आणि पंजाबमधील बलात्कार प्रकरणांत कडक कारवाईची मागणीही जावडेकर यांनी केली आहे.
सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी या दोघांनीही पीडित कुटुंबाची भेट घेतली नाही. त्यांच्या पक्षाने शासित राज्यातील महिलांवर होणाऱ्य्ा अन्यायकडे ते लक्ष देत नाहीत, तर हाथरस आणि इतर ठिकाणी फोटोसाठी भेट देतात, असा आरोप करुन जावडेकर पुढे म्हणाले की, जर हाथरसच्या प्रकरणावरुन तुम्ही (कॉंग्रेस) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करणार असाल, तर मग तोच न्याय पंजाब-राजस्थानसह महाराष्ट्रात का नाही?







