एरंडोलात (उबाठा गटाचे) उमेदवार करण पवार यांचा घाणाघात…
एरंडोल (प्रतिनिधी ) – जनतेला विकासाची आस, आता भाजपचा उलटा प्रवास. जुमलेबजीला जनता कंटाळली, भाजपचा चारशे पारचा नारा ठरेल आभास. अश्या शब्दात भाजपचा समाचार घेत उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार करण पवार यांनी एरंडोल येथून प्रचाराचे रणसिंग फुंकले आहे. महागाई व बेरोजगारीची लाट पसरली असून या लाटेत भाजपची जनता वाट लावेल अशी टीका ही त्यांनी यावेळी केली. एरंडोल येथे पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात ते बोलत होते
भाजप केवळ फोडा फोडीच्या राजकारणाने सत्ता मिळवू पाहत असून त्यांचे हे गलिच्छ राजकारण जास्त दिवस टिकणार नाही, जनता त्यांना आता धडा शिकवणार आहे असा विश्वास करण पवार यांनी या मेळाव्यात व्यक्त केला. दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांच्या स्थानिक राजकारणाने अनेक दिग्गज नेत्यांचे बळी गेल्याचे विधान यावेळी माजी आमदार सतीश पाटील यांनी केले.
एरंडोल तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा मंगळवार, दि. १६ रोजी एरंडोल येथे पार पडला. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे नेते माजी आ. सतीश पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, माजी जि.प. सदस्य बाळासाहेब पवार, नाना महाजन, धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, तालुकाप्रमुख रवींद्र चौधरी, पारोळा तालुकाप्रमुख आर. बी. पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेश देसले, माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, विकास पवार, विजय महाजन, सुनील पाटील, राजेंद्र पाटील, किशोर निंबाळकर, नगरसेवक असलम पिंजारी, अनुराग बेलदार, प्रवीण वाघ, ॲड. अरमान सैय्यद, पराग पवार, राजेंद्र चौधरी, गुलाबसिंग पाटील यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
आता नाही लाट आता लागेल भाजपची वाट
महागाई बेरोजगारी यासारखे मुद्दे सोडून केव्हा पुढच्या राजकारणावर व इतर पक्षातील नेत्यांना ईडीचा धाक दाखवून आपल्या पक्षात घेऊन दुसऱ्याच्या आधारावर पक्ष वाढवण्याचे काम भारतीय जनता पक्ष सध्या करत आहे जनतेला हवा असलेला विकास केवळ कागदावर दाखवून भाजपने गेली दहा वर्ष जनतेची दिशाभूल केली आहे मात्र आता या जुमलेबाजीला जनता भुलणार नसून या निवडणुकीत जनता भाजपला घरची वाट दाखवेल. असा घनाघात करण पाटील यांनी यावेळी केला. मागायला जनता त्रस्त झाली असून भाजपची लाट पूर्णपणे ओसरली आहे. असेही ते म्हणाले. करण पाटील पुढे बोलतांना म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे, तशी राजकारणातही आहे. आपल्याला मान खाली घालायची नसेल तर आपल्याला सुश्म नियोजन करावे लागेल. देशात लाट ओसरल्याचे चित्र दिसत आहे. भाजपचा जो कट्टर कार्यकर्ता आहे तो अजित पवार, अशोक चव्हाण यांच्या सारख्या नेत्यांच्या प्रवेशाने अस्वस्थ आहे. भाजपात प्रचंड अस्वस्थता असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
जनतेत संतापाची लाट : माजी आ. सतीश पाटील
राज्यात जे काही फोडाफोडीचे राजकारण केलं गेलं, यामुळे जनतेत संतापाची लाट पाहायला मिळत आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला ही निवडणूक जिंकावी लागेल.
जिल्ह्यात गिरीश महाजन यांनी केलेल्या राजकारणामुळे अनेकांचे बळी गेले. माजी खा. ए. टी. पाटील यांचे तिकीट कापले गेले. मंगेश चव्हाण यांच्यासाठी उन्मेष पाटील यांची इच्छा नसतांना त्यांना लोकसभा लढायला लावली. उन्मेष पाटील यांचं काम सर्वोत्तम असतांना त्यांचे तिकीट कापले गेल्याचा आरोपही माजी आ. सतीश पाटील यांनी केला.
वाडी, वस्तीपर्यंत आपली निशाणी पोहचवा : संजय सावंत
आजपासूनच आपल्याला प्रचाराला लागायचे आहे. आपल्यासाठी एक-एक दिवस महत्वाचा असून प्रत्येक गाव, वाडी, वस्ती, तांडा आदी ठिकाणी जावून प्रचार करायचा आहे. त्यांच्यापर्यंत आपली निशाणी पोहचवायची आहे, असे आवाहन संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केले.
अबकी बार… करण पवार : गुलाबराव वाघ
यंदाची निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, दादागिरी विरुद्ध सन्मानाची आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक गाव, गल्लीत फिरून करण पाटील यांना विजयी करायचे आहे. विरोधकांकडून अबकी बार चारसो पारचा नारा दिला जात आहे. मात्र, आपल्याला ‘अबकी बार… करण पवार’ चा नारा द्यायचा असल्याचे सहसंपर्क गुलाबराव वाघ यावेळी म्हणाले.
मेळाव्यात जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, राष्ट्रवादीचे उमेश देसले, माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, पारोळा तालुकाध्यक्ष आर.बी. पाटील, जगदीश पाटील, माजी जि.प. सदस्य नाना महाजन, रवींद्र चौधरी आदींनी देखील मनोगत व्यक्त केले.
ठाकरे, पवारांची पावर….
महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करण पवार (पाटील) यांचे एरंडोल येथे आगमन होताच महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांकडून जल्लोषात स्वागत करून एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजयी करु, असा विश्वास यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची पॉवर संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशातही आहे. त्याच जोरावर करण पवार यांची जळगाव लोकसभा मतदारसंघात पॉवर दिसेल. असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. मेळाव्याचे सूत्रसंचालन अतुल महाजन यांनी केले.