मिशन इलेक्शन : लोकसभा निवडणूक वृत्तांत
जळगाव (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. रावेर मतदारसंघात आता भाजपकडून रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा खासदारकीचे तिकीट मिळाले आहे. मागील पंचवार्षिकला रक्षा खडसे यांना सासरे व मातब्बर नेते एकनाथराव खडसे यांचे मोठे पाठबळ होते. यंदा मात्र चित्र उलटे असून एकनाथराव हे आता रक्षाताईंच्या विरोधी उमेदवाराचा प्रचार करणार आहे. रक्षाताईंसमोर मोठी आव्हाने आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक हि रक्षा खडसेंना सोप्पी नाही, हे स्पष्ट आहे. त्यांना हॅट्ट्रिक साधण्यासाठी व विजयासाठी स्वतःची ‘रक्षा’ स्वतःच करावी लागणार असल्याचे चित्र असून पक्षातर्फे कितपत ताकद मिळणार हा संशोधनाचा विषय आहे.
मागील पंचवार्षिकचे चित्र
२०१९ साली रावेर लोकसभा निवडणुकीत भाजपने रावेरच्या जागेवरील आपले वर्चस्व कायम ठेवले होते. दुसऱ्यांदा रक्षा खडसे या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या होत्या. रक्षा खडसे यांच्या विरुद्ध काँग्रेसने माजी खासदार उल्हास पाटील यांना रिंगणात उतरवल होते. मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासून रक्षा खडसे आघाडीवर होत्या.रावेरची ही जागा राष्ट्रवादीने काँग्रेससाठी सोडली होती.रावेरच्या जागेवर भाजपचं चांगलं वर्चस्व आहे. भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे या भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांची सून आहेत. त्यामुळे ही निवडणूक एकनाथ खडसेंसाठी प्रतिष्ठेची ठरली होती. रक्षा खडसे यांना ६ लाख ४९ हजार ८८५ मते मिळाली होती. विरोधी उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांना ३ लाख १८ हजार २९ तर वंचित बहुजन आघाडीचे नितिन कांडेलकर यांना ८७ हजार ७९९ मते प्राप्त झाली होती.
तेव्हाची परिस्थिती
रक्षा खडसेंचा २०१९ साली नेमका कुठला करिश्मा चालला होता, त्यांना कोणत्या बाबींमुळे विजय मिळाला याबाबत जाणून घेणे महत्वाचे आहे. तेव्हा भाजपात असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसेंविषयी मतदारसंघात सहानुभूती होती. एकनाथराव खडसेंनी प्रभावी प्रचार करून सुनेला निवडून आणण्यात यश मिळवले होते. हा मतदारसंघ लेवा पाटील समाज बहुल भाग आहे. तसेच, खा. रक्षा खडसेंना भाजपचा मोदी फॅक्टर कामी आला होता. काँग्रेसनं ऐनवेळेस उमेदवार दिला होता. या सर्व बाबी रक्षाताईंच्या विजयासाठी महत्वाच्या ठरल्या होत्या. रावेर लोकसभा मतदारसंघात पुरुष ५,८३,४२७, स्त्री ५,०५,२६२ आणि इतर १ अशा एकूण १०,८८,६९० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये मतदानाची टक्केवारी पुरुष ६३.१७ टक्के, स्त्री ५९.४८ टक्के, इतर ३.४५ टक्के अशी एकूण ६१.४० टक्के मतदान झाले होते.
*आजची रक्षाताईंसमोरील आव्हाने*
* मातब्बर नेते तथा सासरे एकनाथराव खडसे विरोधी पक्षात
* भाजपातील अनेक पदाधिकाऱ्यांची उमेदवारीबाबत नाराजी, त्यामुळे भुसावळ, रावेरमध्ये त्यांनी राजीनामे दिले.
* काही नेत्यांचीदेखील नाराजी, त्याबाबत अंतर्गत धुसफूस सुरूच आहे.
* भाजपचे मित्र पक्ष शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट यांचा प्रभाव रावेर लोकसभा मतदारसंघात कमी आहे.
* भाजपचे मंत्री, संकटमोचक गिरीश महाजन रक्षाताईच्या विजयासाठी कितपत ताकद लावतात….
* भाजपचे मित्र पक्ष, शिवसेना शिंदे गटाचे मुक्ताईनगर बोदवड मतदारसंघाचे अपक्ष आ. चंद्रकांत पाटलांची जाहीर नाराजी
* मलकापूरात किती मताधिक्य रक्षाताईंना मिळेल ? याबाबत साशंकताच…