वाचा हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज …
मुंबई (वृत्तसंस्था ) ;- सध्या राज्यातून मुसळधार पाऊस गायब झालाआहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याचे चित्र आहे. तसेच तापमानामध्ये देखील आठ ते दहा अंशांनी वाढ झाली असून उकाडा जाणवत आहे. उघडीप दिलेला पाऊस पुन्हा दहा ते बारा दिवसांनी बरसणार असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. राज्यातील कमाल तापमान पाहिले तर कोकण व मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये ते 21 ते 22 अंशावरून ते 30 ते 31 अंशावर गेले आहे. विदर्भामध्ये पावसाचा अंदाज असून त्या भागात 15 ऑगस्ट पासून म्हणजेच कालपासून पाऊस वाढेल. राज्यातील इतर ठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यापासून पुन्हा पाऊस सुरू होईल असा अंदाज आहे.
याबाबत हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ मृत्युंजय महापात्रा यांनी महत्वाची माहिती दिलेली असून त्यानुसार बघितले तर ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यात 94 ते 100% पाऊस बरसणार आहे. ऑगस्ट महिन्याची सुरुवात पाहिली तर ती चांगल्या पावसाने झाली होती. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये सरासरी 53% पर्यंत पाऊस झाला. त्यानंतर नऊ ते दहा ऑगस्टपासून राज्यातील मोठा पाऊस कमी व्हायला सुरुवात झाली.
आता राज्यात 18 ऑगस्टपर्यंत सर्वत्र रिमझिम पावसाचा अंदाज आहे व 19 ऑगस्ट पासून राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडायला सुरुवात होईल असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे. केरळ ते गुजरात राज्याच्या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा जुलै महिनाभर सक्रिय होता व त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी ते मुसळधार असा पाऊस झाला. परंतु सध्या स्थितीत राज्यात कमी दाबाचे पट्टे विरले असून त्यामुळे पावसाचा जोर कमी झाला आहे व त्याचाच परिणाम हा आठ ते दहा अंशांनी तापमानात वाढ झाल्यात दिसून येत आहे. 19 ऑगस्ट पासून पुन्हा पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.