जळगावात गिरणा पम्पिंग येथे घडली होती घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील वाघ नगर येथे राहणाऱ्या ३४ वर्षीय तरुणाचा गणपती विसर्जनादरम्यान गिरणा नदीत बुडून वाहून गेल्याची घटना शनिवारी ६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता समोर आली. हा तरुण आपल्या मित्रासोबत गणपती विसर्जनासाठी गेला होता, परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडून वाहून गेला होता. तब्बल ४ दिवसानंतर बुधवारी १० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता त्यांचा मृतदेह सावखेडा शिवारात तरंगतांना गिरणा नदी पात्रात मिळून आला आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राहुल रतिलाल सोनार (वय ३४, रा. वाघ नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई-वडील आणि मोठ्या भावासह वाघ नगर येथे राहत होता. राहुल सोनार हा कोल्हे हिल्स येथील एका हॉटेलमध्ये नोकरी करत होता. शनिवारी ६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता सुमारास तो मित्र विश्वनाथ पाटील याच्यासोबत आर्यन पार्क येथील गिरणा नदीपात्रात गणपती विसर्जन करण्यासाठी गेला होता. दोघेही गणपती बुडवण्यासाठी पाण्यात उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडू लागले. त्यावेळी एकाने विश्वनाथ पाटील याला पाण्यातून बाहेर काढले, पण दुर्दैवाने राहुल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. राहूलचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू हेाते. अखेर पाचव्या दिवशी बुधवारी १० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता सावखेडा शिवारातील गिरणा नदी पात्रात तरंगतांना मिळून आला आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.