नाशिक विभागातून प्रथम क्रमांक
जळगाव (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विभागीय स्तरीय रांगोळी स्पर्धेत शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील उप-शिक्षिका दिपाली कल्याणराव पाटील यांनी नाशिक विभागातून प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णयश संपादन केले आहे.

धुळे येथे २० डिसेंबर २०२५ रोजी संपन्न झालेल्या या चुरशीच्या स्पर्धेत दिपाली पाटील यांनी आपल्या कलागुणांनी परीक्षकांचे मन जिंकले. या यशाबद्दल त्यांची आता राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्यांनी विद्यालयाच्या व जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
धुळे येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. वनमाला पवार व डॉ. जयप्रकाश पाटील तसेच मान्यवर परीक्षकांच्या हस्ते दिपाली पाटील यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अर्जुन काटोले, उपाध्यक्ष पंडित जाधव, सुरेश अस्वार, शालेय समिती चेअरमन दिलीप बारी, संचालक निलेश खलसे, मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर आणि पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.








