अमळनेर तालुक्यातील नगाव खुर्द येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी): घरासमोर कचरा टाकण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन, सख्ख्या पुतण्याने काकावर लाकडी दांडक्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना नगाव खुर्द ता. अमळनेर येथे घडली आहे. या हल्ल्यात काकाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले असून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगाव खुर्द येथील रहिवासी अजित हिंमतराव बोरसे (वय ४५) हे ३ जानेवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास आपल्या घरासमोर होते. त्यावेळी त्यांना घरासमोर कचरा टाकलेला दिसला, त्यावरून त्यांनी कचरा टाकणाऱ्यांना हटकले होते. त्यानंतर दुपारी १२ वाजेच्या सुमारास बोरसे हे आपली बैलगाडी घेऊन शेताच्या रस्त्याने जात असताना, त्यांचा चुलत पुतण्या मयूर अनिल बोरसे याने त्यांना अडवले. “तुझ्या घरासमोर कचरा मीच टाकला आहे, तू माझे काय करून घेशील?” असे म्हणत मयूरने अजित बोरसे यांना बैलगाडीतून खाली ओढले.
त्यानंतर त्याने हातातील मोठ्या लाकडी दांडक्याने अजित यांच्या नाकावर, पाठीवर आणि डाव्या हातावर जबर मारहाण केली. “तुला संपवून टाकीन” अशी धमकी देत आरोपीने त्यांना रक्तबंबाळ केले. घटनेनंतर जखमी अजित बोरसे यांना तातडीने अमळनेर येथील तुळजाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले. याप्रकरणी अजित बोरसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात आरोपी मयूर बोरसे विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजय भोई हे पुढील तपास करत आहेत.









